पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday 27 September 2017

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

            


‘इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारतमातेच्या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातील सार्‍या मानवाला आपले हे सांस्कृतिक धन म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची १ ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. . त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
बालपण :
२३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत होते. बाळ लहान असतांनाच त्याच्या आईचा देहान्त झाला. या पुत्राच्या प्राप्तीसाठी तिने उपवास आणि कठीण व्रत केले होते.  सूर्यदेवाच्या प्रसादाने जन्मलेल्या या बाळाने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अस्त घडवून आणला.
समवयस्क मुलांपेक्षा भिन्न प्रकृतीचा असणे :
बाळचे सारे शिक्षण घरीच झाले. कारण बाळ बुद्धीमान असला, तरी खट्याळपणामुळे शिक्षकांना आवडत नव्हता. बालपणापासूनच त्याचे विचार वेगळे आणि स्वतंत्र असत. आपल्या समवयस्क मुलांपेक्षा तो भिन्न प्रकृतीचा होता. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्‍या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्‍या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्‍या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस ?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय ?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते तो सहज सोडवत असे.
क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे :
त्याला कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.
महाविद्यालयीन जीवन :
टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. खिस्ताब्द १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.
‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना :
दुहेरी पदवीधर (डबल ग्रॅज्युएट) झाल्याने, ब्रिटिश शासनात चांगल्या वेतनाची जागा मिळणे अशक्य नव्हते; परंतु लहानपणी ठरवल्याप्रमाणे स्वतःचे जीवन देशाला वाहून घ्यायचे त्यांनी निश्चित केले आणि त्याप्रमाणे पुढील पावले उचलली. या कामी त्यांना श्री. आगरकर यांचे पूर्ण सहकार्य लाभले. ज्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी देशास उपयुक्त ठरू शकतील, अशा शिक्षण पद्धतीची योजना टिळक आणि आगरकर यांनी चालू केली. खिस्ताब्द १८८० मध्ये त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विस्तार करायचे ठरवले.
वत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे :
शाळांमधून केवळ विद्याथ्र्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्या पारतंत्र्याचे स्वरूप समजावून सांगायचे होते. लोकांना संघटित करून वर्तमानस्थितीचे भान आणि कर्तव्याची जाण त्यांच्यात निर्माण करायची होती. ‘आहे, हे सर्व प्रभावीरीत्या करायचे, तर वृत्तपत्रांचीच आवश्यकता आहे’, असा विचार त्यांनी केला. त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू केले. काही दिवसांतच ही साप्ताहिके लोकप्रिय झाली. यामध्ये जनतेच्या दुःखाचे सविस्तर विवेचन आणि वास्तविक घटनांचा स्पष्ट उल्लेख असायचा. आपल्या अधिकारांसाठी लढण्याकरिता भारतीयांना सिद्ध केले जात होते. त्यांच्या भाषेमध्ये एवढे सामर्थ्य होते की, भ्याड व्यक्तीच्या ठायीही स्वातंत्र्याची लालसा निर्माण व्हावी. केसरीने इंग्रज सरकारच्या कित्येक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. त्यामुळे शासनाने ‘केसरी’ला न्यायालयात खेचले आणि याचा परिणाम म्हणून टिळक अन् आगरकर यांना ४ मास सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित करणे :
खिस्ताब्द १८९० ते १८९७ ही सात वर्षे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली. टिळक आता राजकारण धुरंधर बनले. सामाजिक सुधारणांसाठी तर त्यांनी शासनाविरुद्ध लढाईच चालू केली. बालविवाहाला प्रतिबंध आणि विधवाविवाहाला संमती मिळावी; म्हणून त्यांनी सर्वांना आवाहन केले. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित केले. मध्यंतरी त्यांची मुंबई विद्यापिठाच्या ‘फेलो’ या पदावर निवड झाली होती. याच वेळी त्यांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला.
प्लेगची महामारी पसरल्याने रुग्णालये उघडणे :
खिस्ताब्द १८९६ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला, प्लेगची महामारी पसरली. त्यासाठी टिळकांनी रुग्णालये उघडली. स्वयंसेवकांच्या साहाय्याने रोग्यांची शुश्रुषा होऊ लागली. संपादकीय लेखातून दुष्काळ आणि महामारीत बळी पडलेल्या लोकांच्या संख्येचे आकडे निर्भयपणे प्रसिद्ध केले. शासनाकडून साहाय्य मागण्याचा आपला अधिकार असून त्यासंबंधी योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी जनतेला सतर्ककेले; पण शासन व्हिक्टोरियाराणीच्या राज्यारोहणाच्या हीरकजयंती महोत्सवाची सिद्धता करण्यात गुंग होते. शेवटी महामारीवरच्या नियंत्रणासाठी रँड नावाच्या अधिकार्‍याची नियुक्ती झाली; पण रँड हा महामारीपेक्षाही भयानक ठरला. भारतीय जनतेवर अत्याचार करण्यात त्याने कुठेही कसूर ठेवली नाही. त्याच्या या अत्याचारामुळे एका युवकाने त्याला गोळी घालून ठार केले. ‘या हत्येमागे टिळकांचा हात असावा’, या संशयाने खिस्ताब्द १८९७ मध्ये त्यांना कारागृहात डांबले.
कारागृहातील जीवन :
येथील जीवन म्हणजे साक्षात् नरकच होता. कोठडीत सदैव अंधःकार असायचा. घोंगड्यामध्ये असंख्य उवा आणि तेवढेच डास असायचे. जोडीला ढेकूणही. खायला कणकेच्या वाळूमिश्रित पोळ्या आणि घालायला जाडेभरडे कपडे. अधिकारी बंदीवानांना निर्दयपणे मारझोड करत आणि काम करवून घेत. टिळकांना नारळाच्या शेंडीपासून दोर वळण्याचे आणि चटई विणण्याचे काम देण्यात आले. जो काही थोडासा निवांत वेळ मिळे, त्यात ते वाचन आणि लेखन करीत. इथे त्यांनी ‘आक्र्टिक होम इन दी वेदाज्’ या ग्रंथाची रचना केली.
स्वदेशीचे आंदोलन साप्ताहिक आणि लेखांद्वारे घराघरात पोहोचवणे :
खिस्ताब्द १८९८ मध्ये दीपावलीच्या दिवशी टिळक कारागृहातून सुटले. लोकांनी जागोजागी दीप उजळून आपला आनंद व्यक्त केला. पुण्यातील प्रमुख मार्गावरून त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक घरी आणण्यात आले. कारागृहातील कष्टांनी त्यांचे आरोग्य फार खालावले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली; पण टिळक असे स्वस्थ थोडेच बसणार होते. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घराघरात पोहोचवला.
राष्ट्राकरिता जीवन समर्पण :
स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारवायांनी इंग्रज शासन चांगलेच चिडले आणि टिळकांवर खोटेनाटे आरोप लादून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. न्यायालयात १४ वर्षेपर्यंत टिळक लढले. जनतेचा आवेश न्यून व्हावा; म्हणून शासनाने अत्यंत कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि ‘देशाचे दुर्भाग्य’ या मथळ्याखाली त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्यांनी लिहिले ‘देशात बॉम्बची निर्मिती होणे, हे देशाचे दुर्दैव होय; परंतु ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे.’ त्यांच्या या जहाल लिखाणामुळे शासनाची पक्की निश्चिती झाली की, जोपर्यंत टिळक मोकळे आहेत, तोवर शासनाला धोका आहे. या लेखाविषयी देशद्रोहाचा आरोप लावून २४ जून १९०८ या दिवशी मुंबईला त्यांना पकडण्यात आले आणि ६ वर्षांची शिक्षा ठोठावली. या वेळी ते ५२ वर्षांचे होते. याच वेळी त्यांना मधुमेहाचा विकार जडला; परंतु त्यांनी पर्वा केली नाही. ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. तेथे टिळकांची लहानशी लाकडी फळ्यांची खोली होती. सश्रम कारावासातून साधा कारावास अशी शिक्षेत घट करण्यात आली. त्यांना लेखन-वाचनाची सवलत मिळाली. इथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या लेखनाचे महान कार्य केले. एकान्त सुसह्य व्हावा; म्हणून ते सदैव लेखन आणि वाचन यांत दंग असत. ६ वर्षांचा कारावास समाप्त होईपर्यंत त्यांनी ४०० पुस्तकांचा संग्रह केला. ‘स्वयंशिक्षक’ मार्गदर्शिकांचा उपयोग करून त्यांनी जर्मन आणि प्रेंâच भाषेचे ज्ञान संपादन केले. वेळेअभावी जी कामे ते पूर्वी करू शकत नसत, त्याकडे ते आता लक्ष पुरवू लागले. सकाळी प्रार्थना, गायत्री मंत्र आणि अन्य वैदिक मंत्रांचा जप अन् अन्य धार्मिक कृत्ये ते करू लागले. ते मंडालेच्या कारावासात असतांनाच सत्यभामाबार्इंचा त्यांच्या पत्नीचा भारतात मृत्यू झाला.
‘होमरूल लीग’ची स्थापना :
८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तीमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. लोकांना संघटित ठेवण्यासाठी त्यांनी सतत प्रवास केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्‍या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशांत नवजागृती निर्माण केली. या त्यांच्या घोषणेने देशाचा कानाकोपरा दुमदुमला. या घोषणेचा प्रभाव भारतीयांच्या मनावर पडू लागला. खिस्ताब्द १९१६ मध्ये त्यांना ६० वर्षे पूर्ण झाली. आता हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. तरीही त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. इंग्लंडमधील एक पत्रकार श्री. चिरोल भारतात आले आणि त्यांनी टिळकांच्या आंदोलनाचा अभ्यास केला. ‘चिरोल खटल्या’करिता त्यांना इंग्लंडला जावे लागले. तेथे १३ मास त्यांना वास्तव्य करावे लागले. त्या प्रकरणात त्यांना मूल्यवान वेळ आणि फार द्रव्य वेचावे लागले. परदेशातही त्यांनी शेकडो सभा गाजवल्या. होमरूल आंदोलन तीव्र केले.
जालियानवाला बाग हत्याकांड :
त्यानंतर जालियानवाला बाग हत्याकांड झाले. निर्दय शासनाने शेकडो निःशस्त्र नागरिकांना रानटी पद्धतीने ठार केले. हे वृत्त कानी पडताच टिळक भारतात परत आले आणि आपल्या मागण्या मान्य होईतोवर आंदोलन चालूच ठेवण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.
देवाज्ञा :
टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्‍यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. 
आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन 

No comments :

Post a Comment