पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday 27 September 2017

शहीद भगतसिंग

शहीद भगतसिंग

शहीद भगतसिंग
 भगतसिंग : (२८ सप्टेंबर १९०७-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. प. पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी ए व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि
आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता; परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग व त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला करणे (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे.ए.स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे इ. कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.
याप्रमाणे कुंदनलाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल व जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला; पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत
करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले (३ फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँब्मस्फोट करण्यात आले; तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरु यांनी केला; परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील ‘साँडर्स मरण पावला’, लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला’, अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा व लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात “जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी ‘हा मोठा आवाज केला आहे’ आणि ‘मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल’
अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे”, असे नमूद केले होते. हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०); पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी म.गांधी व काँग्रेस यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांस यश आले नाही.
भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) इ. नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले; पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक व एकूण कार्यावरुन स्पष्ट होते.भारत – पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
एक अलौकिक व्यक्तिमत्त्व:
भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती.गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
भगतसिंगांचे वाचन:
भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन’ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे ‘वीरा-दी निहिलिस्ट’, क्रोपोटकिनचे ‘मेमॉयर्स’, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’, हॉलकेनचे ‘इटर्नल सिटी’, अप्टन सिंक्लेअरची ‘क्राय फॉर जस्टिस’, रॉस्पिनची ‘व्हॉट नेव्हर हॅपन्ड’, गॉर्कीची ‘मदर’ ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने
प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनय.
भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’,इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीचे ‘महारथी’ नि अलाहाबादचे ‘चॊंद’ या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘चॊंद’ च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य:
९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र:
आरोपपत्र:
“वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ व ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-
१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॊंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍यातसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे
४) आगगाड्या उडविणे
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे
६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व
८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.”
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.
भगतसिंगांचे विचार:
बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात:
‘ जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ’
शहीद भगतसिंग आणि गांधीजी:
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय !!लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले.पण त्याचा काही परिणाम झाला नाही.कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.”भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.
२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.

!! महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन !!

No comments :

Post a Comment