पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

सांगली जिल्हा पर्यटन स्थळे

सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
श्री गणपती मंदिर
  माहिती : सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती अप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर 1843 साली बांधले. मिरज व सांगली संस्थानच्या वाटणीनंतर पटवर्धन हे 1808 पूर्वी सांगलीस आले व सांगली हेच त्यांनी राजधानीचे ठिकाण ठरविले. पटवर्धन हे सांगलीत आले त्यावेळी सांगली शहर हे केवळ पाच हजार लोकवस्तीचे लहान गाव होते. ते राजधानीचे ठिकाण केल्याने गणेशदुर्ग किल्याची उभारणी करण्यात आली. त्याचवेळी सन 1813 च्या सुमारास श्री गणपती मंदिराच्या कामास सुरुवात झाली. कृष्णा नदीच्या काठी हे देऊळ बांधलेले असून पूरापासून ते सुरक्षित रहावे म्हणून या मंदिराची कल्पकतेने उभारणी करण्यात आली आहे. सर्व मंदिराचा आकार तीस/चाळी फूट खोल चुनेगच्चीने भरुन कितीही पाणी वाढले तरी ते देवालयात येणार नाही अशी रचना करण्यात आली आहे.श्री गणपती मंदिर हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ हिंदूच नव्हे तर सर्व धर्मियांची या श्री गजाननावर दृढ श्रद्धा आहे. सध्या गणपती मंदिर परिसर अतिशय देखणा करुन गणपती मंदिर परिसराचा कायापालट करण्यात सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत पटवर्धन यांनी महत्वाकांक्षी योजना राबविली आहे. सांगली रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच कि.मी. अंतरावर सांगली शहरात हे श्री गणपती मंदिर आहे.

ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेब दर्गा
  माहिती : मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणाऱ्या ज्या अनेक वास्तू आहेत त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबांचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लिम भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हुतात्मा अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन हे तुर्कस्थानातील काशगर या गावचे. त्यांच्या बालमनावर जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा या उच्च तत्वाचे संस्कार झाले होते. ते बालपणीच कुराण पठण करू लागले. वयाच्या 18व्या वर्षी ख्वाजा शमशोद्दिन हिंदुस्थानात आले.ख्वाजा साहेबाबद्दल खूपच आख्यायिका आहेत. मिरजेचे राजे श्रीमत पटवर्धन ख्वाजासाहेबांना मानीत असत. मिरजेच्या किल्ल्याला एकदा पडलेला वेढा ख्वाजासाहेबांच्या कृपेनेच निघाला व संकट टळले, अशी आख्यायिका आहे. मिरजेचा हा दर्गा सन 1668 मध्ये बांधण्यात आला. 200 फूट लांब आणि 200 फूट रुंद अशा चौथऱ्यावर हा दर्गा बांधला आहे. स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खाँ यांची कबर याच दर्ग्याच्या आवारात असून त्यांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी येथेचे संगीत सेवेन साजरी करतात. त्यावेळी दर्ग्यामध्ये सतत तीन-चार दिवस देशातील विख्यात संगीत कलाकार येऊन आपली हजेरी लावत असतात. या भागातील संगीत शौकिनांना ही एक प्रकारची पर्वणीच असते. मिरज रेल्वे स्टेशनपासून मिरज शहरात 1 कि.मी. अंतरावर हा दर्गा आहे.

रामलिंग बेट
  माहिती : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगावजवळ बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या निसर्गरम्य व कृष्णामाईच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात धनाजी पाटील व माणिक कारंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बालाजी बोट क्लब स्थापन केला आहे. बोरगाव-रेठरे रस्त्यावरील रामलिंग येथील कृष्णा नदीवरील भव्य पूलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिर परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचं विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला आहे. हे ठिकाण इतक मोहित करणारं आहे की तिथं पोहोचल्यावर कृष्णेच्या शांत आणि मनाला उल्हासित करणाऱ्या पात्रात नौका विहाराला प्रवृत्त व्हायलाच होत. एकूणच आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण, रामलिंग बेटावरची पुरातन देवालय आणि नौका-विहार. रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायच असेल तर रामलिंग नौका विहाराचा आनंद लुटायला लवकरच जायला हवं.

सागरेश्वर अभयारण्य
  माहिती : १०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे. कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत. सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

सागरेश्वर मंदिर
  माहिती : देवराष्ट्र गावच्या हद्दीत सागरेश्वराचे एक फार प्राचीन मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या सभोवताली लहान-मोठी 40 ते 50 मंदिरे आहेत. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे आहे. याठिकाणी पूर्व मुनी राहत असत असे म्हणतात. या भागास पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणत. त्यापैकी ही देवालये बांधली असावीत असे संशोधकाचे मत आहे. देवळांची बांधणी हेमाडपंथी आहे. सागरेश्वराहून देवराष्ट्र गावात जाताना एक प्राचीन तळे आहे. हे कुंतल नरेशाने दुरुस्त केले असे म्हणतात. पूर्वी सूत नावाचे एक महाऋषी होते. त्यावरुन सूत उवाच असा पुराणातील उल्लेख आहे. सूत हा पुराणचा मोठा कथाकार होता. सूताने एकदा व्यासास म्हटले गुरुदेव मी सारी तीर्थे हिंडलो परंतु मला मानसिक समाधान नाही. मला आत्मिक समाधान लाभेल असे ठिकाण सांगा. व्यासानी समुदेश्वराच्या महादेवाचे मंदिर सुचविले. तेव्हापासून ऋषीनी याठिकाणी अनंत तप केले व ती भूमी पावन झाली असे म्हणतात.

संगमेश्वर देवस्थान, हरिपूर
  माहिती : सांगली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हरिपूर हे छोटेसे गाव आहे. येथे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो. याठिकाणी संगमेश्वर हे देवस्थान असून श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक भाविक येथे येतात. नद्याच्या संगमाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी लोक येतात. तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले आहे. तो पार आजही येथे पहावयास मिळतो.

रेवणसिध्द रेणावी
  माहिती : विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धाचे स्वयंभू स्थान आहे. देवालयाच्या पूर्व बाजूस उसळसिद्ध व पश्चिम बाजूला भुयारात विश्वाराध्य आहे. देवापुढे एक मोठा नंदी असून नंदीमागे पंच कलशाप्रमाणे प्राचार्य आहेत. हा रेणावी डोंगर पूर्वी पंच धातूचा म्हणजे सुवर्ण, तांबे, लोखंड वगैरे धातूंचा होता अशी आख्यायिका आहे. डोंगरावरील पांढऱ्या खड्यांचा भस्माप्रमाणे उपयोग करतात. तालमीसाठी लागणाऱ्या तांबड्या मातीच्या खाणी या डोंगरावर आहेत. येथे निरनिराळ्या रंगाची माती सापडते. त्यामुळे संशोधन करण्यासारखे हे ठिकाण आहे. या डोंगरावर 84 तिर्थे होती असा उल्लेख आहे.

श्री. दत्त मंदिर औदुंबर
  माहिती : सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांपैकी श्री क्षेत्र औदुंबर हे एक श्री दत्तात्रयाचे जागृत देवस्थान आहे. पलूस तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या काठी रम्य वनश्रीमध्ये नदीच्या काठावर हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्ताच्या पादुका आहेत. भिलवडी रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेस चार किलोमीटरवर हे तीर्थक्षेत्र आहे. कृष्णेच्या घाटावरील श्री दत्तात्रयाचे देऊळ, ब्रम्हानंद स्वामीचा मठ, श्री भूवनेश्वरी देवीचे देऊळ या सर्व क्षेत्र समुहामुळे या परिसराचे महात्म्य वाढले आहे. श्री ब्रम्हानंद स्वामी इ.एस.1826 मध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे आले व त्यांनी मठी उभारुन तप करण्यास सुरुवात केली. पुढे या क्षेत्रीच त्यांनी समाधी घेतली. त्यांची शिष्य परंपरा अजूनही चालू आहे. श्री दत्त पादुकावर दगडी देवालय पूर्वाभिमुखी आहे. नदी पलिकडे श्री भूवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. देवीची मुर्ती काळ्या दगडाची असून सुंदर आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपूर पाहण्यासारखे आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते. याठिकाणी विश्रामगृह बांधण्यात आले असून मंदिरासाठी नदीकिनारी पूरसंरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे.

तासगाव गणेश मंदिर
  माहिती : सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे. गोपूरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत. मंदिरात जाताना उजव्या बाजूस श्री गजाननाचा एक मोठा लाकडी रथ होता, तो निकामी झाल्याने त्याच्याऐवजी आता लोखंडी रथ तयार केला आहे. दरवर्षी गणपती उत्सवात हा रथ बाहेर काढतात. तो शेकडो माणसे मोठ्या भक्तीभावाने ओढतात. तासगावचा हा श्री गजानन उजव्या सोंडेचा असून तो जागृत आहे.

दंडोबा हिल स्टेशन
  माहिती : सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी असूनही इथली पर्यटनस्थळं ही एका दिवसाचे पिकनिक स्पॉट ठरली आहेत. या ठिकाणांचा विकास होण्याची गरज आहे. याच तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे.

चांदोली अभयारण्य
  माहिती : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकास चांदोलीजवळ वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ हे 34.20 टी.एम.सी क्षमतचे धरण बांधले आहे. वसंतसागर जलाशय म्हणून ओळखल जाते. धरणाची लांबी 1580 मीटर असून ह्या धरणाचा बांध मातीचा आहे. या धरणाचा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीच्या सिंचनासाठी लाभ होत आहे. अलिकडेच बांधण्यात आलेले मोठे धरण आहे. धरण परिसर पर्यटकांचे आकर्षक ठिकाण झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य असून हे नैसर्गिक अभयारण्य सांगली-कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. कसे जावे... चांदोली राष्ट्रीय उद्यान हे मुंबईपासून ३८० किलोमीटरवर तर पुण्यापासून २१० किलोमीटरवर आहे. सांगली शहरापासून फक्त ८५ किलोमीटर तर कोल्हापूरपासून ८० किलोमीटरवर आहे. याठिकाणी बसने जाता येते.

No comments :

Post a Comment