लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील माहिती
!! लोकशाहीर !!
तुकाराम भाऊराव साठे
(ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९)
अण्णाभाऊ साठे नावाने प्रसिद्ध, मराठीलेखक, शाहिर व समाज सुधारक होते.
जन्म : ऑगस्ट १, इ.स. १९२० , वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा
मृत्यू : जुलै १८, इ.स. १९६९ , राष्ट्रीयत्व : भारतीय , टोपण नावे : अण्णाभाऊ, शाहिर, कादंबरीकार
धर्म : हिंदू, जोडीदार : जयवंता साठे, अपत्ये : शांता आणि शकुंतला, वडील : भाऊराव साठे, आई : वालुबाई साठे
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले.[ संदर्भ हवा ]अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.
जीवन :
ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातीलवाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. हे गाव पूर्वी कुरुंदवाडसंस्थानात होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णाभाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.
लेखन :
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
क्रांतिकारक लेखक / कवी :
अण्णाभाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्रराज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड :
लावणीचा एक प्रकार म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.
अण्णा भाऊंच्या कादंबर्या :
‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणार्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.
वैजयंता :
वैजयंता ही अण्णा भाऊ साठेे यांची नावाजलेली कादंबरी आहे. अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे लेखन हे वास्तव जगताचे प्रतिनिधित्व करणारे आहे. समाजातील हेच वास्तव अण्णा भाऊ यांनी वैजयंता कादंबरीतून समाजासमोर मांडलेले आहे. या कादंबरील नायिका ही तमाशात काम करणारी स्त्री आहे. तमाशा ही कला समाजात बदनाम झालेली कला समजण्यात आलेली आहे. त्यामुळे आपोआपच या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीयांकडेदेखील बदमान अथवा व्यभिचारी स्त्रीया म्हणून पाहण्यात येते. त्यांच्या व्यवसायाला जातीच्या अस्तित्त्वाचे पदर असल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन तसाच हिनकस असल्याचे दिसते. जातव्यवस्थेतील सर्वात
अण्णा भाऊंच्या कथा :
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले.
‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोर्यामार्या करणार्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.
अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी लिहिली लिहिली गेलेली पुस्तके :
Anna Bhau Sathe (चरित्र लेखक - डॉ. बजरंग कोरडे; मूळ इंग्रजी. साहित्य अकादमीद्वारा कन्नड, गुजराती, तेलुगू, मराठी आदी भाषांत भाषांतरित झालेले पुस्तक)अण्णा भाऊ साठे (चरित्र लेखक - बाबूराव गुरव)अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)माझा भाऊ अण्णा भाऊ (चरित्र - लेखक - शंकर साठे)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (चरित्र - डॉ. भगवान कौठेकर)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय (प्रकाशक -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जातिअंताचा लढा’ हा लेख आला होता.
ध्वनिफीत :
अण्णा भाऊ साठे आणि लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर लोकप्रबोधिनी कलामंचाने ‘सिंहाचा छावा’ नावाची ध्वनिफीत बनवली आहे.
साहित्य संमेलने :
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक साहित्य संमेलने होतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात. उदा० अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन किंवा साहित्यिक अण्णा भाऊ साहित्य संमेलन वगैरे वगैरे.
पुरस्कार आणि सन्मान :
पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक (१९५८)१९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
No comments :
Post a Comment