गांधी विचार आणि आजची तरूणाई
गांधी विचार आणि आजची तरूणाई
आजच्या काळात पुस्तकी ज्ञान म्हणजेच सर्वस्व असे झालेले आहे. महात्मा गांधीजींनी कृतीयुक्त शिक्षणाची कल्पना मांडलेली आपणाला दिसून येते. शिक्षणामध्ये स्वावलंबन महत्वाचे आहे. पण आजचा तरूण आळशी बनत चाललेला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ‘२ ऑक्टोबर’ हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने सुध्दा ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’म्हणून घोषित केलेला आहे. महात्मा गांधीजी यांची जयंती फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरी करण्यात येते. महात्मा गांधी यांच्या विचारांची आजच्या तरूणांना फार मोठी गरज आहे. महात्मा गांधीजींनी जो विचार मांडला, जी तत्वे त्यांनी अंगिकारली आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आपलं जीवन व्यथित केलं, ती तत्वे घेवून आपल्याला पुढे जायचं आहे. गांधी विचार आणि गांधीजींचे जीवन समजणे आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक तरूणाने गांधीजींना वाचले पाहिजे, त्यांच्या कार्य आणि विचाराला समजून घेतले पाहिजे.
खर तर आजचा तरूण काही प्रमाणात दिशाहिन बनत चालला आहे. या दिशाहिन बनत चाललेल्या तरूणाला दिशा मिळण्यासाठी गांधी विचार खूप महत्वाचे आहेत. ऐहिक आणि भौतिक सुखाला आपण बळी पडत चाललेलो आहोत. सोशल मिडीया आणि इंटरनेटचा मोठया प्रमाणात वापर आणि त्याला बळी पडलेला तरूण आपल्याला दिसत आहे. चैनविलासी जीवन प्रवृत्ती मोठया प्रमाणात वाढलेली आहे. इंटरनेटच्या विळख्यात मोठया प्रमाणात तरूण अडकल्यामूळे त्याला आई-वडीलांशी सूध्दा बोलायला वेळ नाही. पिझ्झा आणि बर्गरच्या दुनियेत तरूण वावरत आहे. आजच्या काळात पुस्तकी ज्ञान म्हणजेच सर्वस्व असे झालेले आहे. महात्मा गांधीजींनी कृतीयुक्त शिक्षणाची कल्पना मांडलेली आपणाला दिसून येते. शिक्षणामध्ये स्वावलंबन महत्वाचे आहे. पण आजचा तरूण आळशी बनत चाललेला आहे.
महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारा तरूण निर्माण होणे आवश्यक आहे. हस्तोद्योग, कुटिरोद्योग, शेतीउद्योग याला प्राधान्य देणे आवश्यक आहे आणि आजच्या तरूणांनी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधने आवश्यक आहे. हेच महात्मा गांधीजींना अपेक्षित होते. ते आज मोठया प्रमाणात दिसत नाही. व्यवसाय करायला आजचा तरूण घाबरत असताना तसेच आजच्या तरूणाला शेतीव्यवसायाची लाज वाटत असताना आपल्याला दिसते. शेती करणे म्हणजे कमीपणाचे असा मानणारा तरूण वर्ग निर्माण होत आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधीजींनी जो विचार मांडला तो खूप महत्वाचा आहे. ‘खेडयाकडे चला’ अशी घोषणा करून महात्मा गांधीजींनी खेडयांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम केले.
खेडयातील ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ अशी विचारधारा मांडून कृषी विकासाला चालना देण्याचे काम महात्मा गांधींजीनी केले. संयम, शांती, आत्मनिर्भरता, विवेकनिष्टा, शुध्द चारित्र्य निर्मितीसाठी गांधी विचार महत्वाचे आहेत. हे आजच्या तरूणांनी समजून घेणे महत्वाचे आहे. देशालाच नव्हे तर जगाला जर समाज विघातक घटनांपासून वाचवायचे असेल, जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर गांधीं विचार आत्मसात करणे आणि त्या विचारांचा आग्रह करणे आवश्यक आहे. गांधी विचार, जीवन व कार्यावर तरूणांनी आत्मचिंतन आणि मनन करावे.
आज आपल्या देशामध्ये मोठया प्रमाणात समाजविघातक घटना, दहशतवादाचे सावट, दंगली घडून येताना दिसत आहे. आजचे कट्टरवादी तरूण दहशतवादाचे समर्थन करताना दिसत आहेत. पण पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की, युध्द, दंगे आणि अशांततेने कुणालाही सफलता प्राप्त झालेली नाही. कुणीही सत्यावर विजय मिळविलेला नाही. म्हणूनच पूर्ण हयातभर गांधीजींनी सत्याचा आग्रह धरून समाजाला दिशा दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामध्ये यशस्वीही झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने गांधी विचारांचे पाईक होऊन समाज आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचे कार्य करायचे आहे.
लेखन: परशुराम माळी
No comments :
Post a Comment