पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर

जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर

रजेच्या वेळी जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर करुन वर्गावर LIVE नियंत्रण ठेवणे


1) जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा.
2) जुन्या मोबाइलमध्ये At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे) इंस्टॉल करावे।app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे.
3) वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे. app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे.
4) पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे.
5) त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे.
6) आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल. आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो.
7) दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते. मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो.

मा.मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक

मा.मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक

हरितक्रांतीचे प्रणेते, मा.मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक
मानवता, न्‍याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्‍यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्‍पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री पद भूषविलेल्‍या दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांची सोमवार दि. 1 जुलै रोजी 100 वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरी केली जात आहे. हरित क्रांतीचे प्रणेते, थोर नेते वसंतराव नाईक यांच्‍या कार्याचा आढावा...
वसंतराव नाईक यांचा जन्‍म बंजारा समाजामध्‍ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्‍या पोटी दि. 1 जुलै 1913 रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्‍हणून त्‍यांना लोक नाईक म्‍हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्‍सी या ठिकाणी झाले. त्‍या काळी वाहनांची सोय नसल्‍यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्‍टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. तत्‍कालीन नागपूर जुन्‍या मध्‍यप्रदेशाची राजधानी होती. नागपूर शहराचे प्रभाव वसंतरावांच्‍या जिवनात फार महत्‍त्‍वाचे ठरले. तेथे त्‍यांच्‍यात अमुलाग्र बदल होत गेला. वाचनाची उदंड आवड निर्माण होवून महात्‍मा फुले व अन्‍य समाजसुधारकांचे वाचन केले. त्‍यांनी नागपूरच्‍या मॅरिश कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयात विविध जातीचे धर्माचे विद्यार्थी होते. त्‍यांचा त्‍यांच्‍याशी संपर्क आला. त्‍यातूनच समाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. मुळातच लहानपणापासून चाणाक्ष बुध्‍दी व वाकपटुता अंगी असल्‍याचे पुढील व्‍यक्‍तीवर प्रभाव पडत असे. सन 1933 साली नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्‍तीण झाले.
नागपूर विद्यापिठातून सन 1937 साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे 1940 साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सन 1941 साली प्रारंभी अमारावतीचे प्रख्‍यात वकील कै.बॅ. पंजाबराव देशमुख यांच्‍याबरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकीली व्‍यवसायास सुरुवात केले. सर्वांचे विरोध पत्‍करुन दि. 16 जुलै 1941 रोजी त्‍यांनी बाह्मण समाजातील वत्‍सला घाटे हिच्‍याशी आंतरजातीय विवाह केला. दोघांच्‍याही परिवारातुन आंतरजातीय विवाहास कडाडुन विरोध होता. दोघानीही समाजाची पर्वा न करता समाज परिवर्तनाचा हा मार्ग त्‍यांनी निर्माण केला. वकीली व्‍यवसायात त्‍यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्‍याचे प्रयत्‍न केले. यात त्‍यांना मोठे यश आले.
    डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्‍हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्‍ह्यात ख्‍याती पसरली. या काळात शेतक-यांच्‍या फायद्याचे 74 कलम पास व्‍हावे, यासाठी शेतक-यांत मिळून प्रचार केला. सन 1943 साली पुसद कृषी मंडळाचे अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची निवड झाली. सन 1946 मध्‍ये त्‍यांनी कॉंग्रेस पक्षामध्‍ये प्रवेश केला. वसंतराव नाईक यांचे राजकारण हे मूळक्षेत्र नसताना देखील जनमानसाच्‍या‍ विश्‍वासातून सन 1950 पर्यंत तालुका अध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली. याचवर्षी पुसद हरिजन मोफत वसतीगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे नाईक हे अध्‍यक्ष होते. त्‍यावेळी विदर्भ प्रतिक अध्‍यक्ष बियागीकडे होते. सन 1946 मध्‍ये पुसद नगरपालिका निवडणुकीमध्‍ये कॉंगेसच्‍यावतीने निवडणुक लढविली त्‍यात वसंतराव नाईक विजयी होवून त्‍यांची पुसद नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. त्‍यावेळी झालेल्‍या निवडणुकीत वसंतराव नाईक हे 12 हजार मतांनी निवडून आले. यवतमाळ जिल्‍ह्याचे प्रतिनिधी म्‍हणून मध्‍यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले. सन 1951 साली ते मध्‍यप्रदेश सहकारी मध्‍यवर्ती बँकेचे संचालक होते. याचवर्षी विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍यपदी निवड झाली. सन 1956 साली भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्‍यांनी उपमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्‍यांनी महसूल खात्‍याची जबाबदारी अत्‍यंत हुशारीने पार पाडली. दि. 1 नोव्‍हेंबर 1956 रोजी द्विभाषीक मुंबई राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात सहकार, कृषी, दुग्‍धव्‍यवसाय या खात्‍याचे मंत्री म्‍हणून त्‍यांचा समावेश झाला. त्‍यावेळी यशवंतराव चव्‍हाण हे मुख्‍यमंत्री होते. अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉग्रेस समितीचे व कार्यकारणीच्‍या सदस्‍यपदी त्‍यांची निवड झाली.
    सन 1955 साली वसंतराव नाईक यांनी यवतमाळ जिल्‍ह्यातून व विदर्भातून हजारो एकर जमीन भुदानासाठी मिळवून दिले. याच कालावधीमध्‍ये इंदिरा गांधी व डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्‍या हस्‍ते पाच हजार एकराचे भुदान केले. तत्‍पुर्वी अखिल भारतीय कॉंग्रेस अध्‍यक्ष यु.एन. टेंबर यांच्‍या हस्‍ते पुसद तालुक्‍यातील सात हजार एकर जमीन भुदान केले. सन 1957 च्‍या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी दत्‍तराम देशमुख यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला व त्‍यांची पुसद मतदार संघातून दुस-यांदा निवड होवून यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या मंत्रीमंडळात वसंतराव नाईक यांची कृषी मंत्री म्‍हणून निवड करण्‍यात आली. तेंव्‍हापासून कृषी क्षेत्रात परिवर्तनाला सुरुवात झाली. सन 1958 साली जपानला गेलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय राईस कमिशनच्‍या भारतीय शिष्‍टमंडळात समावेश करण्‍यात आला व त्‍यांनी जपानला भेट दिली. टोकीयो येथे एफ.ए.ओ. च्‍या बैठकांना ते हजर होते. ते दि. 14 सप्‍टेंबर 1959 ला चीन सरकारच्‍या निमंत्रणावरुन चीन भेटीला रवाना झाले. त्‍यानंतर त्‍यांनी सन 1958 साली जपानचा दौरा केला.सन 1959 साली गोर-गरीबांच्‍या मुलांना शिक्षणाची सोय व्‍हावी म्‍हणून, फुलसिंग नाईक मह‍ाविद्यालयाची पुसद येथे स्‍थापना केली.  दि. 1 मे 1960 रोजी मराठी भाषेचे महाराष्‍ट्र राज्‍य अस्तित्‍वात आले. राज्‍याच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक महाराष्‍ट्राचे महसुलमंत्री होते. त्‍याच काळात म्‍हणजे दि. 3 सप्‍टेंबर 1960 रोजी नाईक यांचे वडील फुलसिंग नाईक यांचा मृत्‍यू झाला. ही बातमी समजताच हे पुसदला निघाले, रस्‍त्‍याने जाताना दुष्‍काळी कामाबाबत अधिका-यांना सूचना देत वडिलांच्‍या मृत्‍यूपेक्षा गोर-गरीब जनतेचे दुःख मोठे आहे, असे समजून यवतमाळ जिल्‍ह्याचा दुष्‍काळी दौरा केला. सन 1962 साली झालेल्‍या निवडणुकीत त्‍यांच्‍या प्रतिस्‍पर्धी सौ. नलिनीबाई यांचा 17 हजार मतांनी नाईक यांनी पराभव केला व पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होवून त्‍यांची पुन्‍हा महसूल मंत्री म्‍हणून निवड करण्‍यात आली.
    यशवंतराव चव्‍हाण हे भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्‍यामुळे महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचे सुत्रे दादासाहेब कन्‍नमवार यांच्‍या हाती आले. परंतु एक वर्षानंतर म्‍हणजे 1963 साली दादासाहेब कन्‍नमवार यांचे निधन झाल्‍यामुळे वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्‍यमंत्रीपदी निवड झाली. सन 1964 साली त्‍यांनी युगोस्‍लाव्हिया या देशाचा दौरा केला. सन 1966 साली एक नवा इतिहास महाराष्‍ट्रात घडला, ते म्‍हणजे 1 मे रोजी मराठी ही भाषा महाराष्‍ट्राची भाषा म्‍हणून घोषित करण्‍यात आली व महाराष्‍ट्र राज्‍याचा कारभार मराठी भाषात सुरु झाला. सन 1965 साली भारत-पाक संघर्ष सुरु होताच दि. 9 ते 11 सप्‍टेंबरला मुंबईत स्‍फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात चैतन्‍यदायी वातावरण निर्माणे झाले. नंतर काही महिने युध्‍द सज्‍जतेसाठी त्‍यांनी महाराष्‍ट्राचा दौरा केला. याच वर्षी शेती उत्‍पादनाच्‍या नव्‍वा कार्यक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील 25 जिल्‍ह्यांचा दौरा त्‍यांनी केला. सन 1966 साली अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्‍या शेतक-यांना हिंमत देण्‍यासाठी राज्‍यातील दुष्‍काळ जिल्‍ह्यांत झंझावती दौरा त्‍यांनी केला.
    सन 1967 साली सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रभावी प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा केला. या निवडणुकीत विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्‍यांदा निवड होवून दि. 6 मार्च 1967 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदावर दुस-यांदा वसंतराव नाईक यांची एकमताने निवड झाली.    कृषी क्षेत्राविषयी अत्‍यंत आवड असल्‍यामुळे नाईक यांच्‍या प्रयत्‍नामुळे 15 लाख टन धान्‍य अधिक उत्‍पादन वाढले. त्‍यातून दि. 19 एप्रिल 1969 साली पंजाबराव कृषी विद्यालयाची स्‍थापना करुन शेतकी व्यवसायात भर टाकण्‍यात मदत केली. 10 मे 1968 रोजी गुन्‍हेगारांना मुक्‍त जगता, यावे यासाठी पहिले खुले कारागृह पैठण येथे स्‍थापन केले व गुन्‍हेगारांना माणूस म्‍हणून जगण्‍यास मार्ग दाखविला. सन 1970 साली शहरी जीवनात वाढ व्‍हावी, गोरगरीब मध्‍यमवर्गीयाना शहरात नौकरी करता यावी, म्‍हणून शासनातर्फे लोकांच्‍या मदतीला हातभार म्‍हणून 18 मार्च रोजी सिडकोची स्‍थापना केली. त्‍यातून लोकांना निवारा मिळाला. याचवर्षी अमेरिकेच्‍या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपीय देशांना भेटी त्‍यांनी दिले. सन 1972 साली पुन्‍हा सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रचारासाठी राज्‍यभर दौरा करुन पुसद मतदार संघातून वसंतराव नाईक यांची पाचव्‍यांदा निवड होवून दि. 14 मार्च 1972 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली. सन 1972 ते 1973 साली राज्‍यात दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांचे भुकेने बेहाल, जनावरांचा चारा यासारख्‍या गंभीर समस्‍या नाईक यांच्‍या समोर आ वासून उभ्‍या होत्‍या. मात्र त्‍या अडचणीवर त्‍यांनी मात करुन विविध कामे सुरु केली. मजुरदार लोकांना सुगडी खाण्‍यास देऊ केले. विविध योजना राबवून जनतेला दिलासा दिला. राज्‍यातील नऊ जिल्‍ह्यातील दुष्‍काळ हा देशातील इतर कोणत्‍याही भागातील दुष्‍काळापेक्षा अधिक तीव्र स्‍वरुपाचा होता. त्‍यावेळी त्‍यांनी प्रत्‍येक जिल्‍ह्यात फिरुन दुष्‍काळी कामाला मोठ्याप्रमाणावर चालना दिली. दि. 20 फेब्रुवारी 1975 साली वसंतराव नाईक यांनी मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दि. 12 मार्च 1977 साली वसंतराव नाईक यांनी वासीम मतदार संघातून खासदार म्‍हणून लोकसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक केंद्रात जावूनही जनतेला विश्‍वासात घेऊन विविध विकास कामे पार पाडली. डोंगर कपारीत व रानोमाळ भटकणा-या बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन दिली. समाज जागृतीचा पहिला अध्‍याय त्‍यांनी समाजाला दिला. त्‍यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्‍येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्‍येक ठिकाणी एक माणुस म्‍हणून पुढं यावे, हीच त्‍यांची इच्‍छा होती. दि. 18 ऑगस्‍ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्‍सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्‍यावर्षी निधन झाले

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर


सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगाला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसार‘या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चवळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्‍नागिरीत केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२ व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

            


‘इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारतमातेच्या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातील सार्‍या मानवाला आपले हे सांस्कृतिक धन म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची १ ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. . त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
बालपण :
२३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत होते. बाळ लहान असतांनाच त्याच्या आईचा देहान्त झाला. या पुत्राच्या प्राप्तीसाठी तिने उपवास आणि कठीण व्रत केले होते.  सूर्यदेवाच्या प्रसादाने जन्मलेल्या या बाळाने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अस्त घडवून आणला.
समवयस्क मुलांपेक्षा भिन्न प्रकृतीचा असणे :
बाळचे सारे शिक्षण घरीच झाले. कारण बाळ बुद्धीमान असला, तरी खट्याळपणामुळे शिक्षकांना आवडत नव्हता. बालपणापासूनच त्याचे विचार वेगळे आणि स्वतंत्र असत. आपल्या समवयस्क मुलांपेक्षा तो भिन्न प्रकृतीचा होता. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्‍या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्‍या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्‍या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस ?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय ?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते तो सहज सोडवत असे.
क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे :
त्याला कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.
महाविद्यालयीन जीवन :
टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. खिस्ताब्द १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.
‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना :
दुहेरी पदवीधर (डबल ग्रॅज्युएट) झाल्याने, ब्रिटिश शासनात चांगल्या वेतनाची जागा मिळणे अशक्य नव्हते; परंतु लहानपणी ठरवल्याप्रमाणे स्वतःचे जीवन देशाला वाहून घ्यायचे त्यांनी निश्चित केले आणि त्याप्रमाणे पुढील पावले उचलली. या कामी त्यांना श्री. आगरकर यांचे पूर्ण सहकार्य लाभले. ज्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी देशास उपयुक्त ठरू शकतील, अशा शिक्षण पद्धतीची योजना टिळक आणि आगरकर यांनी चालू केली. खिस्ताब्द १८८० मध्ये त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विस्तार करायचे ठरवले.
वत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे :
शाळांमधून केवळ विद्याथ्र्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्या पारतंत्र्याचे स्वरूप समजावून सांगायचे होते. लोकांना संघटित करून वर्तमानस्थितीचे भान आणि कर्तव्याची जाण त्यांच्यात निर्माण करायची होती. ‘आहे, हे सर्व प्रभावीरीत्या करायचे, तर वृत्तपत्रांचीच आवश्यकता आहे’, असा विचार त्यांनी केला. त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू केले. काही दिवसांतच ही साप्ताहिके लोकप्रिय झाली. यामध्ये जनतेच्या दुःखाचे सविस्तर विवेचन आणि वास्तविक घटनांचा स्पष्ट उल्लेख असायचा. आपल्या अधिकारांसाठी लढण्याकरिता भारतीयांना सिद्ध केले जात होते. त्यांच्या भाषेमध्ये एवढे सामर्थ्य होते की, भ्याड व्यक्तीच्या ठायीही स्वातंत्र्याची लालसा निर्माण व्हावी. केसरीने इंग्रज सरकारच्या कित्येक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. त्यामुळे शासनाने ‘केसरी’ला न्यायालयात खेचले आणि याचा परिणाम म्हणून टिळक अन् आगरकर यांना ४ मास सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित करणे :
खिस्ताब्द १८९० ते १८९७ ही सात वर्षे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली. टिळक आता राजकारण धुरंधर बनले. सामाजिक सुधारणांसाठी तर त्यांनी शासनाविरुद्ध लढाईच चालू केली. बालविवाहाला प्रतिबंध आणि विधवाविवाहाला संमती मिळावी; म्हणून त्यांनी सर्वांना आवाहन केले. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित केले. मध्यंतरी त्यांची मुंबई विद्यापिठाच्या ‘फेलो’ या पदावर निवड झाली होती. याच वेळी त्यांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला.
प्लेगची महामारी पसरल्याने रुग्णालये उघडणे :
खिस्ताब्द १८९६ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला, प्लेगची महामारी पसरली. त्यासाठी टिळकांनी रुग्णालये उघडली. स्वयंसेवकांच्या साहाय्याने रोग्यांची शुश्रुषा होऊ लागली. संपादकीय लेखातून दुष्काळ आणि महामारीत बळी पडलेल्या लोकांच्या संख्येचे आकडे निर्भयपणे प्रसिद्ध केले. शासनाकडून साहाय्य मागण्याचा आपला अधिकार असून त्यासंबंधी योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी जनतेला सतर्ककेले; पण शासन व्हिक्टोरियाराणीच्या राज्यारोहणाच्या हीरकजयंती महोत्सवाची सिद्धता करण्यात गुंग होते. शेवटी महामारीवरच्या नियंत्रणासाठी रँड नावाच्या अधिकार्‍याची नियुक्ती झाली; पण रँड हा महामारीपेक्षाही भयानक ठरला. भारतीय जनतेवर अत्याचार करण्यात त्याने कुठेही कसूर ठेवली नाही. त्याच्या या अत्याचारामुळे एका युवकाने त्याला गोळी घालून ठार केले. ‘या हत्येमागे टिळकांचा हात असावा’, या संशयाने खिस्ताब्द १८९७ मध्ये त्यांना कारागृहात डांबले.
कारागृहातील जीवन :
येथील जीवन म्हणजे साक्षात् नरकच होता. कोठडीत सदैव अंधःकार असायचा. घोंगड्यामध्ये असंख्य उवा आणि तेवढेच डास असायचे. जोडीला ढेकूणही. खायला कणकेच्या वाळूमिश्रित पोळ्या आणि घालायला जाडेभरडे कपडे. अधिकारी बंदीवानांना निर्दयपणे मारझोड करत आणि काम करवून घेत. टिळकांना नारळाच्या शेंडीपासून दोर वळण्याचे आणि चटई विणण्याचे काम देण्यात आले. जो काही थोडासा निवांत वेळ मिळे, त्यात ते वाचन आणि लेखन करीत. इथे त्यांनी ‘आक्र्टिक होम इन दी वेदाज्’ या ग्रंथाची रचना केली.
स्वदेशीचे आंदोलन साप्ताहिक आणि लेखांद्वारे घराघरात पोहोचवणे :
खिस्ताब्द १८९८ मध्ये दीपावलीच्या दिवशी टिळक कारागृहातून सुटले. लोकांनी जागोजागी दीप उजळून आपला आनंद व्यक्त केला. पुण्यातील प्रमुख मार्गावरून त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक घरी आणण्यात आले. कारागृहातील कष्टांनी त्यांचे आरोग्य फार खालावले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली; पण टिळक असे स्वस्थ थोडेच बसणार होते. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घराघरात पोहोचवला.
राष्ट्राकरिता जीवन समर्पण :
स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारवायांनी इंग्रज शासन चांगलेच चिडले आणि टिळकांवर खोटेनाटे आरोप लादून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. न्यायालयात १४ वर्षेपर्यंत टिळक लढले. जनतेचा आवेश न्यून व्हावा; म्हणून शासनाने अत्यंत कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि ‘देशाचे दुर्भाग्य’ या मथळ्याखाली त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्यांनी लिहिले ‘देशात बॉम्बची निर्मिती होणे, हे देशाचे दुर्दैव होय; परंतु ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे.’ त्यांच्या या जहाल लिखाणामुळे शासनाची पक्की निश्चिती झाली की, जोपर्यंत टिळक मोकळे आहेत, तोवर शासनाला धोका आहे. या लेखाविषयी देशद्रोहाचा आरोप लावून २४ जून १९०८ या दिवशी मुंबईला त्यांना पकडण्यात आले आणि ६ वर्षांची शिक्षा ठोठावली. या वेळी ते ५२ वर्षांचे होते. याच वेळी त्यांना मधुमेहाचा विकार जडला; परंतु त्यांनी पर्वा केली नाही. ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. तेथे टिळकांची लहानशी लाकडी फळ्यांची खोली होती. सश्रम कारावासातून साधा कारावास अशी शिक्षेत घट करण्यात आली. त्यांना लेखन-वाचनाची सवलत मिळाली. इथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या लेखनाचे महान कार्य केले. एकान्त सुसह्य व्हावा; म्हणून ते सदैव लेखन आणि वाचन यांत दंग असत. ६ वर्षांचा कारावास समाप्त होईपर्यंत त्यांनी ४०० पुस्तकांचा संग्रह केला. ‘स्वयंशिक्षक’ मार्गदर्शिकांचा उपयोग करून त्यांनी जर्मन आणि प्रेंâच भाषेचे ज्ञान संपादन केले. वेळेअभावी जी कामे ते पूर्वी करू शकत नसत, त्याकडे ते आता लक्ष पुरवू लागले. सकाळी प्रार्थना, गायत्री मंत्र आणि अन्य वैदिक मंत्रांचा जप अन् अन्य धार्मिक कृत्ये ते करू लागले. ते मंडालेच्या कारावासात असतांनाच सत्यभामाबार्इंचा त्यांच्या पत्नीचा भारतात मृत्यू झाला.
‘होमरूल लीग’ची स्थापना :
८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तीमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. लोकांना संघटित ठेवण्यासाठी त्यांनी सतत प्रवास केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्‍या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशांत नवजागृती निर्माण केली. या त्यांच्या घोषणेने देशाचा कानाकोपरा दुमदुमला. या घोषणेचा प्रभाव भारतीयांच्या मनावर पडू लागला. खिस्ताब्द १९१६ मध्ये त्यांना ६० वर्षे पूर्ण झाली. आता हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. तरीही त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. इंग्लंडमधील एक पत्रकार श्री. चिरोल भारतात आले आणि त्यांनी टिळकांच्या आंदोलनाचा अभ्यास केला. ‘चिरोल खटल्या’करिता त्यांना इंग्लंडला जावे लागले. तेथे १३ मास त्यांना वास्तव्य करावे लागले. त्या प्रकरणात त्यांना मूल्यवान वेळ आणि फार द्रव्य वेचावे लागले. परदेशातही त्यांनी शेकडो सभा गाजवल्या. होमरूल आंदोलन तीव्र केले.
जालियानवाला बाग हत्याकांड :
त्यानंतर जालियानवाला बाग हत्याकांड झाले. निर्दय शासनाने शेकडो निःशस्त्र नागरिकांना रानटी पद्धतीने ठार केले. हे वृत्त कानी पडताच टिळक भारतात परत आले आणि आपल्या मागण्या मान्य होईतोवर आंदोलन चालूच ठेवण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.
देवाज्ञा :
टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्‍यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. 
आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन-जीवन परिचय

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन : ५ सप्टेंबर १८८८ –१७ एप्रिल १९७५ - भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.
त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ –१६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ –३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ – ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली. अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले. तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.
त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.
सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो. 
बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही. बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात. 
खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.
द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या ⇨ विशिष्टाद्वैत   मताकडे – म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे ⇨ बोधिसत्व   संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे व प्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.
धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.
आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील

!! कर्मवीर !!
कर्मवीर भाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; कुंभोज, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
चरित्र : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटूंबात झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.रयत शिक्षण संस्था संपादन करा
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[१] श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवल
!! रयतगीत !!
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील माहिती 
!! लोकशाहीर !!
तुकाराम भाऊराव साठे
(ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९)
अण्णाभाऊ साठे नावाने प्रसिद्ध, मराठीलेखक, शाहिर व समाज सुधारक होते.
जन्म : ऑगस्ट १, इ.स. १९२० , वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा
मृत्यू : जुलै १८, इ.स. १९६९ , राष्ट्रीयत्व : भारतीय , टोपण नावे : अण्णाभाऊ, शाहिर, कादंबरीकार
धर्म : हिंदू,  जोडीदार : जयवंता साठे, अपत्ये : शांता आणि शकुंतला, वडील : भाऊराव साठे, आई : वालुबाई साठे
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले.[ संदर्भ हवा ]अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.
जीवन :
ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातीलवाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. हे गाव पूर्वी कुरुंदवाडसंस्थानात होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णाभाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्‍नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.
लेखन :
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
क्रांतिकारक लेखक / कवी :
अण्णाभाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्रराज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड :
लावणीचा एक प्रकार म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.
अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या :
‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणार्‍या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्‍या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.
वैजयंता :
वैजयंता ही अण्णा भाऊ साठेे यांची नावाजलेली कादंबरी आहे. अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे लेखन हे वास्तव जगताचे प्रतिनिधित्व करणारे आहे. समाजातील हेच वास्तव अण्णा भाऊ यांनी वैजयंता कादंबरीतून समाजासमोर मांडलेले आहे. या कादंबरील नायिका ही तमाशात काम करणारी स्त्री आहे. तमाशा ही कला समाजात बदनाम झालेली कला समजण्यात आलेली आहे. त्यामुळे आपोआपच या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीयांकडेदेखील बदमान अथवा व्यभिचारी स्त्रीया म्हणून पाहण्यात येते. त्यांच्या व्यवसायाला जातीच्या अस्तित्त्वाचे पदर असल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन तसाच हिनकस असल्याचे दिसते. जातव्यवस्थेतील सर्वात
अण्णा भाऊंच्या कथा :
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले.
‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोर्‍यामार्‍या करणार्‍या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.
अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी लिहिली लिहिली गेलेली पुस्तके :
Anna Bhau Sathe (चरित्र लेखक - डॉ. बजरंग कोरडे; मूळ इंग्रजी. साहित्य अकादमीद्वारा कन्नड, गुजराती, तेलुगू, मराठी आदी भाषांत भाषांतरित झालेले पुस्तक)अण्णा भाऊ साठे (चरित्र लेखक - बाबूराव गुरव)अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)माझा भाऊ अण्णा भाऊ (चरित्र - लेखक - शंकर साठे)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (चरित्र - डॉ. भगवान कौठेकर)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय (प्रकाशक -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्‍या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जाति‍अंताचा लढा’ हा लेख आला होता.
ध्वनिफीत :
अण्णा भाऊ साठे आणि लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर लोकप्रबोधिनी कलामंचाने ‘सिंहाचा छावा’ नावाची ध्वनिफीत बनवली आहे.
साहित्य संमेलने :
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक साहित्य संमेलने होतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात. उदा० अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन किंवा साहित्यिक अण्णा भाऊ साहित्य संमेलन वगैरे वगैरे.
पुरस्कार आणि सन्मान :
पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक (१९५८)१९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.

शहीद भगतसिंग

शहीद भगतसिंग

शहीद भगतसिंग
 भगतसिंग : (२८ सप्टेंबर १९०७-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. प. पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी ए व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि
आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता; परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग व त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला करणे (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे.ए.स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे इ. कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.
याप्रमाणे कुंदनलाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल व जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला; पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत
करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले (३ फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँब्मस्फोट करण्यात आले; तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरु यांनी केला; परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील ‘साँडर्स मरण पावला’, लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला’, अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा व लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात “जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी ‘हा मोठा आवाज केला आहे’ आणि ‘मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल’
अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे”, असे नमूद केले होते. हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०); पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी म.गांधी व काँग्रेस यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांस यश आले नाही.
भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) इ. नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले; पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक व एकूण कार्यावरुन स्पष्ट होते.भारत – पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
एक अलौकिक व्यक्तिमत्त्व:
भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती.गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
भगतसिंगांचे वाचन:
भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन’ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे ‘वीरा-दी निहिलिस्ट’, क्रोपोटकिनचे ‘मेमॉयर्स’, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’, हॉलकेनचे ‘इटर्नल सिटी’, अप्टन सिंक्लेअरची ‘क्राय फॉर जस्टिस’, रॉस्पिनची ‘व्हॉट नेव्हर हॅपन्ड’, गॉर्कीची ‘मदर’ ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने
प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनय.
भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’,इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीचे ‘महारथी’ नि अलाहाबादचे ‘चॊंद’ या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘चॊंद’ च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य:
९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र:
आरोपपत्र:
“वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ व ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-
१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॊंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍यातसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे
४) आगगाड्या उडविणे
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे
६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व
८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.”
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.
भगतसिंगांचे विचार:
बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात:
‘ जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ’
शहीद भगतसिंग आणि गांधीजी:
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय !!लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले.पण त्याचा काही परिणाम झाला नाही.कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.”भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.
२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.

!! महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन !!

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज
बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून, स्वाभिमानाचे  जीवन देणारे,  आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक,रयतेचे राजे,समतावादी लोकराजे,राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते, बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे, द्रष्टे समाजसुधारक, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, जाणता राजा
राजर्षी शाहू महाराज
शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला . त्यांचे मुळ नाव यशवंत होते. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानची अधिकारसुत्रे आपल्या हाती घेतली .छत्रपती शाहूंचे प्रजेविषयी कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करुन ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरीयाने त्यांना 'महाराज' ही पदवी बहाल केली , त्यांनी अनेक वसतिगृहे सुरु केली . बहुजन समाजासाठी आणि अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यांनी भरभरून कार्य केले .
सहा फुट चार इंच उंचीचे बलदंड शरीर , कणखर धिप्पाड रुंद छाती , टपोरे डोळे ,पहाडी आवाज ,अफाट ताकद असलेल्या या राज्याला नियतीने उणेपुरे ४८ वर्षाचे आयुष्य दिले . ६ मे १९२२ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले
"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.
आरक्षणाचे प्रणेते :
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.
तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका :
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.
राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती :
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.
राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य :
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.
वेदोक्त प्रकरण :
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.
शाहू महाराजांचे आर्थिक धोरण :
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.
संस्थात्मक योगदान :
ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 - विधवा विवाहाचा कायदा.
1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
राजर्षी शाहूंचा वारसा :
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
राजर्षी शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.